लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाºया रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाला, कचरा गोळा करणारा, शिलाई कामगार, चर्मकार, घरेलु कामगार, छोटया दुकानात काम करणाºयाकामगार व मजूरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू झाली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना सीईओ मीना यांनी केले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दिलासा म्हणून ही योजना लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगाटतील तसेच १५ हजारांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणारे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत तसेच तो कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा. जिल्हयातील सर्व असंघटीत कामगारांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ १५ फेब्रुवारी २०१९ रोजी केला असून याकरीता कामगारांचे वय ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा ३ हजार रुपये मानधन ‘पेंशन’ म्हणून मिळणार आहे. तसेच लाभार्थी कामगारांचा मृत्यु झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरु ठेवता येणार असून जर लाभार्थीस सदर योजनेतुन बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार आहे. सदर योजनेस पात्र असणाºया असंघटीत कामगारास वयनिहाय मासिक वर्गणी कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त २०० रुपये आकारण्यात आलेली असून तेवढीच मासिक वर्गणी शासन जमा करणार आहे. याबाबत ग्रामपंचायत, नगरपरिषदांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही मीना यांनी दिल्या आहेत. या योजनेत सहभागी होणाºया लाभार्थीस इतर कोणतेही शुल्क नागरी सुविधा केंद्र, सी.एस.सी केंद्र येथे अदा करावे लागणार नसून ते शासनाकडून परस्पर अदा करण्यात येणार आहे.जिल्हयातील सर्व असंघटीत कामगारांनी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक व भ्रमणध्वनीसह नजीकच्या नागरी सुविधा केंद्र, आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन स्वयंघोषणापत्राचे आधारे योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी केले.
असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 3:14 PM