वाशिम : जऊळका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्ली शेतशिवरामध्ये सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखच्या पथकाने २२ जून रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी ५२ हजाराचा सडवा नष्ट करून भास्कर लक्ष्मण पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कार्ली येथील भास्कर पांडे नामक इसम त्याच्या शेतामध्ये गावठी हातभट्टीद्वारे दारू काढत असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक विनीता साहु यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक आर. जी. शेख, बुद्धू रेघीवाले, प्रदीप चव्हाण, नंदकिशोर भडके, सखाराम वंजारे, गजानन गोटे व आत्माराम राठोड यांच्या पथकाने पांडे याच्या शेतामध्ये छापा टाकला. पोलिस पथक आपल्याकडे येत असल्याची चाहूल लागताच भास्कर पांडे हा घटनास्थळाहून पसार होण्यात यशस्वी ठरला. तथापी, पोलिसांनी घटनास्थळावरील मोहा माच, बिबे, विषारी वनस्पतींची पाने, ५0 लिटर गावठी दारू असा एकूण ५२ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलिसांनी पांडे याच्याविरुद्ध जऊळका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२८ , मुंबई प्रोव्हीशन अँक्ट कलम ६५ (फ)(ड)(ई) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध कलम ३२८ नोंदविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईतील मालवणी प्रकरणापासून जिल्हाभरात गावठी हातभट्टीवर छापे टाकण्याच्या मोहिमेला गती आली आहे.
कार्ली येथील गावठी हातभट्टीवर छापा
By admin | Published: June 24, 2015 1:43 AM