लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम) : बीडवरून नागपूरकडे जाणाºया एका खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील किन्हीराजा गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ २८ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने समयसूचकता दाखवून बसमधील १८ प्रवाशांचा सुखरूप बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. एमच २३ जे ९०० क्रमांकाची खासगी बस गुरूवार, २७ जून रोजी रात्री बीडवरून नागपूरकडे नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरून जात होती. दरम्यान किन्हीराजा ता. मालेगाव या गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ २८ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान खासगी बसेसचे लाईट अचानक बंद झाल्याचे चालक शिवाजी गवते यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच वाहक महादेव गवते यांना ही बाब सांगून बसमधील प्रवाशांना खाली उतरविण्याच्या सूचना केल्या. दोघा भावांनी खासगी बसने पेट घेण्यापूर्वी र् क्षणाचाही विलंब न लावता बसमधील १८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळेतच या बसने पेट घेतला. दरम्यान, या आगीची माहिती वाशिम नगर परिषदेच्या अग्निमशन विभागाला मिळताच, अग्निशमन दलाचे चालक दिनकर सूरोशे, फायरमन गजु सुर्वे, प्रशांत पाटणकर, सागर निवलकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत बस जळून खाक झाली.
खासगी बसला आग; सर्व प्रवाशी सुखरूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 4:48 PM