लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासन आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतली असून, खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत ठेवून रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी २६ मार्च रोजी दिले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. संचारबंदीच्या काळात काही सेवांना वगळले असून, यामध्ये आरोग्य व मेडकील स्टोअर्सचा समावेश आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा या शहरासह ग्रामीण भागातील बहुतांशी खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे गर्दी, ताप, खोकला व अन्य आजारांशी सामना करणाºया रूग्णांची गैरसोय होत आहे. काही खासगी डॉक्टरांनी मात्र माणूसकीचा परिचय देत आपले दवाखाने सुरू ठेवले आहेत. या डॉक्टरांप्रमाणेच इतर सर्व डॉक्टरांनीदेखील आपले दवाखाने सुरू ठेवून गर्दी होणार नाही याची दक्षता घेत रुग्णसेवा द्यावी, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी दिले आहेत. बहुतांश खासगी दवाखाने बंद असल्याने लहान मुले, महिला, वृध्द यांच्यावर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दीत वाढ झाली. अगोदरच शासकीय रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ताण आला आहे; त्यातच बहुतांश खासगी दवाखाने बंद असल्याने सरकारी रुग्णालयात धांदल उडत आहे. खासगी दवाखाने बंद ठेवणाºयांची माहिती संकलित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिल्या होत्या. या सुचनांचे पालन म्हणून जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद ठेवणाºयांची माहिती संकलित केली जाईल तसेच सर्व डॉक्टरांनी आपापले खासगी दवाखाने सुरू ठेवून रुग्णसेवा द्यावी, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी गुरूवारी दिले.
सर्दी, ताप, खोकला व अन्य आजारी रुग्णांच्या सेवेसाठी खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू ठेवणे आवश्यक आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
खासगी दवाखान्यातील कंपाऊंडर, सिस्टर येत नसल्याने डॉक्टरांसमोर पेच निर्माण झाला आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यातील बहुतांश खासगी दवाखाने सुरू असून, आवश्यक ती सेवा देत आहे. याऊपरही काही दवाखाने बंद असतील तर त्यांनीदेखील कंपाऊंडर व सिस्टरला बोलावून दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सांगितले जाईल.- डॉ. अनिल कावरखेअध्यक्ष, इंडियन मेडीकल असोसिएशन, वाशिम