जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून जानेवारीअखेरपर्यंत कायम राहिलेल्या संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० बाधित आढळून आले. साधारणत: फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. ती तुलनेने अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटा आणि आरोग्यविषयक सुविधा तोकडी पडणार असल्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण बहुतांशी दूर झाला.
दरम्यान, १ जूनपासून कोरोनाने बाधित रुग्णांच्या आकडेवारीत परिणामकारक घट झाली आहे. विशेषत: काही खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांची संख्या सध्या शून्यावर आली आहे. यामुळे प्रशासनाने १४ जून ते ७ जुलै या कालावधीत १७ खासगी रुग्णालयांना नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
....................................
अभिलेखांची तपासणी करून घेण्याचे आवाहन
कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापकांनी परवानगीच्या कालावधीत भरती असलेल्या कोविड रुग्णांच्या अभिलेखांची जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे गठीत करण्यात आलेल्या पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
..............
कोट :
कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खालावल्याने परवानगी देण्यात आलेल्या १७ खासगी रुग्णालयांना नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत किंवा कसे याबाबत खात्री करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम