लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे संतप्त झालेल्या खासगी शिक्षण संस्था चालकांनी २ नोव्हेंबरला पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला वाशिम जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद लाभला, असा दावा शिक्षण संस्था चालक संघटनेने केला. शासनमान्य अनुदानित शाळांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. एकिकडे अनुदानित शाळांना अडचणीचे ठरणारे निर्णय घ्यायचे आणि दुसरीकडे ‘मागेल त्याला शाळा’ हे धोरण चालूच ठेवायचे, या कुटनितीमुळे खासगी अनुदानित शाळा संचालक अडचणीत सापडले असून, याविरोधात आवाज उठविण्याबरोबरच विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ नोव्हेंबरला खासगी शाळांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदमध्ये वाशिम जिल्ह्यातील १०० टक्के शाळा सहभागी झाल्याचा दावा शिक्षण संस्था संघटनेचे विभागीय अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक यांनी केला.व्यावसायीक खासगी कंपनीला शाळा देण्याचे विधेयक मागे घ्यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया पुर्ववत करावी, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी, पवित्र पोर्टल ही संगणकीय प्रणाली बंद करून शिक्षण संस्थेचा शिक्षक भरती विषयक अधिकार कायम ठेवावा, वेतनेत्तर अनुदान पुर्वीप्रमाणेच १२ टक्के देण्यात यावे, वाडी-वस्ती व दुर्गम भागातील अनुदानित शाळा बंद करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, कर्मचारी भरती बंद असताना महाराष्ट्रात मागासवर्गीय अनुशेष भरण्याच्या परिपत्रकानुसार भरण्यात आलेली चार हजार पदे नियमित करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी शिक्षण संस्था संघटनेने केली आहे.दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी प्रथम सत्र परीक्षेचा असलेला पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर आता ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
विविध मागण्यांसाठी खासगी शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:52 PM