शासकीय परिवहन सेवा प्रभावित होत असल्याचा गैरफायदा तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या काही खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून घेतला जात असल्याचे दिसून येते. तालुक्यातील गरजू आणि गरीब मजुरांकडून पुणे ते मानोरा इथपर्यंत येण्यासाठी पंधराशे ते दोन हजार रुपये तिकीट दर आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मानोरा ते पुणे या खासगी प्रवासी वाहतूक करीत असलेल्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रतिप्रवासी एक हजार रुपये भाडे आकारणी होत आहे.
राज्यातील औद्योगिक महानगर म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद येथून मानोरा तालुक्यामध्ये खासगी वाहनाने येणे सर्वसामान्य मजूरवर्गाला परवडत नाही. रेल्वे आणि राज्य शासनाची एसटी बससेवा बंद असल्याचा गैरफायदा पुणे ते मानोरा आणि मानोरा ते पुणे या मार्गावर सुरू असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून घेतला जात असल्याचे दिसून येते.