वाशिम, दि. २- पूर्वी साठवणुकीच्या अडचणीमुळे अडचणीत आलेली नाफेडची तूर खरेदी आता बारदान्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील नाफेडची खरेदी बंद असून, आता मार्च एंडिंगच्या ताळेबंदासाठी बाजार समित्यांमधील व्यापार्यांची खरेदीही बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा तुरीच्या पेर्यात वाढ झाली आणि उत्पादनही बर्यापैकी झाले. त्यामुळे बाजारात तुरीची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली होती. तथापि, बाजारात हमीदराहून कमी दराने व्यापार्यांकडून तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी निराश असताना नाफेडने खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकर्यांना आधार मिळाला खरा; परंतु आठ-आठ दिवस बाजारात थांबूनही नाफेडच्या केंद्रावर शेतकर्यांच्या मालाची मोजणी होत नव्हती. त्यातच साठवणुकीसाठी जागा नसल्याने फेब्रुवारी महिन्यात काही दिवस खरेदी थांबली. वखार महामंडळाची गोदामे भरली आणि खासगी गोदामे भाड्याने मिळत नसल्याने अखेर वाशिम जिल्ह्यात खरेदी केलेली तूर अकोला येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्याच्या निर्णयानुसार खरेदी सुरू झाली. काही दिवस खरेदी झाली असतानाच आता बारदाना नसल्याने नाफेडची खरेदी बंद पडली आहे. मंगरुळपीर येथे फूड कॉर्पोरेशन ऑफइंडियाने, तर वाशिम, मालेगाव आणि कारंजा येथे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेडने १ लाख क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी केली आहे. अद्यापही शेतकर्यांकडे लाखो क्विंटल तूर पडून आहे; परंतु व्यापार्यांसह नाफेडची खरेदीही बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.नाफेडकडून बारदाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांच्या अधिकार्यांशी चर्चा करून बारदाना मागविण्यात येईल. तो सोमवारी मिळण्याचा विश्वास असल्याने आमची खरेदी सोमवारपासूनच करण्यात येईल. - मनोज बाजपेयी जिल्हा मार्केटिंग अधिकारी
‘नाफेड’च्या बारदाना तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम!
By admin | Published: April 03, 2017 2:06 AM