संतोष वानखडे, वाशिम : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त १ ऑक्टोबर रोजी कामरगावात (ता.कारंजा) मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते. विविधरंगी पगडी, पांढरे वस्त्र आणि हिरवे ध्वज हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते.
३० सप्टेंबरला कामरगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने कामरगावातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, १ आक्टोंबर ला काढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सजवलेल्या गाड्या, हिरव्या पताका व शुभेच्छा फलक हातात घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. कामरगावातील मुख्य मार्गाने फिरुन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकी दरम्यानचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे व कामरगाव पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.