लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पद्धतीने खरीप आणि रब्बी पिकांचे उत्पादन घेतानाच दीड एकर शेतात हंगामी फुलशेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील शेतकरी गणेश भिमराव चव्हाण गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत.जोगलदरी येथील गणेश चव्हाण हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ६.५ एकर शेती असून, या शेतीत सिंचनासाठी त्यांनी विहिरही खोदली आहे. ते आपल्या शेतीत खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभºयासह भाजीपाल्याची पिकेही घेतात. त्यातच गेल्या काही वर्षांत पारंपरिक पिकांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्याने गणेश चव्हाण यांनी हंगामी फुलशेतीचा आधार घेतला आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते आपल्या शेतीमधील दीड एकर क्षेत्रात झेंडुच्या फुलांची लागवड करीत आहेत. यासाठी त्यांना अधिकाधिक १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. खरीपाच्या पेरणीनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या शेतात झेंडुची लागवड करतात आणि नवरात्रीच्या उत्सवादरम्यान झंडू फुले तोडणीवर आल्यानंतर त्याची बाजारपेठेत विक्री सुरू करतात. त्यांना दरवर्षी एका एकरात २५ क्विंटल झेंडुचे उत्पादन होते. हंगामात या फुलांना चांगला भाव मिळतो. दिवाळीपर्यंत ते फुलांची तोडणी करून बाजारात विकतात. गेल्या सहा वर्षांत त्यांनी केवळ दीड एकर शेतीतून प्रतिवर्षी ७० ते ८० हजार रुपये प्रमाणे साडेचार लाखांच्या आसपास उत्पादन घेतले आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यानचे वातावरण झेंडुसाठी पोषक असल्याने त्यांना पाणी देण्याची फारशी गरज भासत नाही. या शेतीमुळे इतर पिकांच्या झालेल्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई करणे त्यांना शक्य होत आहे. विशेष म्हणजे झेंडुची काढणी झाल्यानंतर त्यांना या दीड एकरात रब्बी हंगामातील गहू पिकाची लागवडही करणे शक्य होत असल्याने त्यांनी झेंडूच्या शेतीचा आधार घेतला आहे.
हंगामी फुलशेतीमधून लाखोंचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:40 PM