कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हंगामी फळपिकांकडे कल वाढला असून, अनेक शेतकरी खरबूज, टरबूज, पपई आदी फळपिकांची लागवड करीत आहेत. त्यात मेहा येथील प्रगतशील युवा शेतकरी रोशन कडू यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीमधील एक एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनात रोशन कडू यांनी टरबूज पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. खते, फवारणी आणि पाण्याचा प्रभावी वापर केल्याने त्यांचे हे पीक चांगलेच बहरले. अवघ्या ७० दिवसांच्या कालावधीत त्यांचे पीक परिपक्व होऊन विक्रीस तयार झाले असून, त्यांचे तब्बल ३० टन टरबुजाचे उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत बाजारात टरबुजाला चांगला दर असल्याने या पिकाचे उत्पन्नही अपेक्षेनुरूप मिळत असल्याचे रोशन कडू यांनी सांगितले.
----
कोट : सिंचनाची सोय असेल व श्रम मेहनत घेऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नफ्याची शेती करणे सहज शक्य होते. शिक्षण घेऊन केवळ नोकरीची अपेक्षा करीत बसण्यापेक्षा मेहनतीने कष्ट करून शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य होते.
-रोशन कडू, युवा शेतकरी, मेहा
-----------
कोट : मेहा येथे काही शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केली आहे. त्यात रोशन कडू यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन टरबूज पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना या पिकाचे ३० टन उत्पादन घेणे शक्य झाले. इतरही शेतकऱ्यांचे मोठे उत्पादन होत आहे.
- संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी, कारंजा