लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. या अंतर्गत सर्व व्यापारी, दुकानदार व व्यावसायिकांचीही लवकरच कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:ची चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २० आॅगस्ट रोजी केले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेवून त्यांचे अलगीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्ट सोबतच रॅपिड अॅन्टिजन टेस्टवरही भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, औषध विक्रेते, फळे व भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते, सलून चालक यासह इतर सर्व व्यावसायिकांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांना आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.
लवकर उपचाराने रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिककोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ताप, सर्दी, कोरडा खोकला, घसा दुखणे, जिभेची चव जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी स्वत:हून आरोग्य तपासणी करून घ्यावी. प्रत्येक तालुक्यात कोरोना विषयक चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रशासनाने ८३७९९२९४१५ या व्हॉट्सअप हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध केली.