लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यसरकारच्या शिक्षणविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत महाराष्ट्रातील प्राध्यापक संघटनांनी २५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातीलही प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून विविध महाविद्यालयांसमोर आंदोलनास सुरूवात केली आहे. विविध स्वरूपातील प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी २ जुलै २०१८ पासून आंदोलन पुकारले असून यादिवशी सरकारला पुढील आंदोलनाची सूचना देखील देण्यात आली होती. त्यानुसार, ६ आॅगस्ट २०१८ ला आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून महाविद्यालयांमध्ये काळ्याफिती लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. २० आॅगस्ट २०१८ ला सहसंचालकांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन झाले. त्यानंतर २७ आॅगस्ट २०१८ ला पुणे येथील उच्चशिक्षण विभाग कार्यालयावर धरणे आंदोलन आणि त्यानंतर ४ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई येथे जेलभरो आंदोलन पार पडले. ११ सप्टेंबर २०१८ ला प्राध्यापकांनी एकदिवशीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले. मात्र, त्याऊपरही मागण्या निकाली निघाल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव व ठरल्यानुसार २५ सप्टेंबर २०१८ पासून बेमुदत कामबंद आंदोलात सहभागी झालो आहोत, असे आंदोलक प्राध्यापकांनी सांगितले.प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये सन २०१४ पासून महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविणे, २००५ नंतर सेवेत असलेल्या प्राध्यापकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, २०१३ मध्ये परिक्षेच्या कामावरील बंदीमध्येही काम केले, त्या ७१ दिवसांचा पगार देण्यात यावा, कंत्राटी शिक्षकांचे मानधन वाढविण्यात यावे, सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू व्हावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिक्षणविरोधी धोरणांविरूद्ध प्राध्यापकांचा ‘एल्गार’; बेमुदत कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 2:25 PM