वाशिम : भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजींनी शांततेचा संदेश दिला आहे. शांततेच्या मार्गानेच समाजाची प्रगत होते. म्हणून प्रत्येकाने शांततेच्या मार्गाचा पुरस्कार केला पाहिजे, असे मत सिंधी समाज संघटनेचे वाशिम अध्यक्ष गोकुलदास जीवनाणी यांनी व्यक्त केले. गुरूनानकजींचा संदेश, गुरूनानक जयंतीनिमित्त उपक्रम व कोरोनामुळे घ्यावयाची दक्षता यासंदर्भात त्यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, ते बोलत होते.
गुरूनानकजींच्या संदेशाचे पालन केले जाते काय?भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच गुरूनानकजी यांनी शांततेचा संदेश दिला. गरजूंना मदत करणे, शांतता, बंधूभाव जपणे या तत्वांचे पालन केले जाते. थोर महापुरूषांनी समाजाच्या हिताचे संदेश दिले आहेत. याचे पालन सर्वांनी केल्यास समाजासमाजात शांतता नांदून राज्य, देशाचा विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
गुरूनानक जयंतीनिमित्त कोणते उपक्रम घेतले जातात?दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरूनानक जयंती साजरी केली जाते. लंगर (महाप्रसाद) कार्यक्रम व्यापक प्रमाणात घेतला जातो. गुरूनानक जयंतीनिमित्त आठवडाभर विशेष कार्यक्रम असतात. सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमही राबविले जातात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर सावट आहे. शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक मिरवणूकदेखील काढण्यात येणार नाही.
कोरोनामुळे कोणती दक्षता घेतली जाणार?सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या दृष्टिकोनातून यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सकाळी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. अन्य सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणार नाही. दरवर्षी दिवसभर दुकाने बंद ठेवली जात होती. यावर्षी दुपारनंतर दुकाने सुरू केली जाणार आहेत.