ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि, 24 - जलसंपदा विभागाच्या वतीने यंदा जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. असे असताना चोरट्या मार्गाने विनापरवाना पाण्याचा बेसुमार उपसा देखील सुरूच असल्यामुळे जिल्ह्यातील १२३ पैकी ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
वाशिम जिल्ह्यात यावर्षी ७४ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांचा पेरा करण्यात आला आहे. या पिकांना जलसंपदा विभागाने सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध करून दिली असून २० हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन प्रकल्पातून ठिबक आणि स्प्रिंकलरव्दारे पाणी सोडले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील अधिकांश सिंचन प्रकल्पांवरून विनापरवाना चोरट्या मार्गाने पिकांच्या सिंचनासाठी पाण्याचा बेसुमार उपसा केला जात असल्याने उन्हाळ्यापूर्वीच प्रकल्प कोरडे पडण्याची भिती वर्तविली जात आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, असे संकेत वर्तविले जात आहेत.
एकबूर्जी, सोनल या मध्यम प्रकल्पांसह जवळपास ७० लघुप्रकल्पांमधील पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरे तथा नागरिकांसाठी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे. चोरट्या मार्गाने होणाºया पाण्याच्या उपश्यावरही नियंत्रण ठेवण्याचा सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत, असे शिवाजी जाधव कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम यांनी याविषयी सांगितले.