लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळात (एसटी) खात्यांतर्गत बढतीसाठी घेण्यात येणाऱ्या वरिष्ठ लिपिक आणि वाहतूक निरिक्षकांच्या परिक्षा तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खात्यांतर्गत होणारी बढती प्रक्रिया ही लांबणीवर पडली आहे. या संदर्भात १६ नोव्हेंबर रोजी महामंडळाने परिपत्रक जारी केले आहे.एसटी महामंडळातील वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या प्रवर्गाच्या खात्यांतर्गत बढतीसाठी २५ नोव्हेंबर रोजी लेखी परिक्षा घेण्याचे महामंडळाने ठरविले होते. या संदर्भात विभाग नियंत्रकस्तरापर्यंत परिपत्रक पाठवून उमेदवारांचे अर्ज मागविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या; परंतु आता तांत्रिक अडचणींमुळे २५ नोव्हेंबर रोजी होणारी ही परिक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे बढती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. या प्रक्रिये संदर्भात अधिक सुधारित प्रक्रियेबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडून सबंधित कार्यालयांना सुचना देण्यात येणार असल्याचे या संदर्भात १६ नोव्हेंबर रोजी जारी परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
एसटीतील खात्यांतर्गत बढती प्रक्रिया लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 3:13 PM