लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांनी पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवली आहे. दुसरीकडे यावर्षीदेखील बहुतांश शेतकºयांची सोयाबीन पेरणीला पसंती राहिल, असा अंदाज गृहित धरून कृषी विभागाने जिल्ह्यातील चार लाख १५ हजार हेक्टवर पेरणीचे नियोजन केले आहे. शेतातील काडीकचरा वेचणे, वखरणी आदी कामे पूर्ण केली असून पेरणीसाठी शेतकºयांनी जमिन सज्ज ठेवली आहे. यावर्षीदेखील बहुतांश शेतकरी सोयाबीनची पेरणी करतील, असा अंदाज कृषी विभागाला आहे. त्या दृष्टिने खरिप हंगामातील पेरणीचे नियोजन केले असून, एकूण चार लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. यापैकी २ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल, असे कृषी विभागाने गृहित धरले आहे. ६० हजार हेक्टरवर तूर, २५ हजार हेक्टरवर कपाशी, १५ हजार हेक्टरवर मुग व २० हजार हेक्टरवर उडीद या प्रमुख पिकांच्या पेरणीचा अंदाज आहे. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर आणि त्यानंतर संभाव्य पावसाचा अंदाज पाहून शेतकºयांनी पेरणीला सुरूवात करावी. हवामान खात्याचा अंदाज तसेच कृषी विभागाच्या सल्ल्याने शेतकºयांनी पेरणी करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे ढग पसरू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी बियाणे, खतांसह इतर कृषी निविष्ठांची खरेदी स्थगित केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.
मान्सून लांबणीवर: कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 5:26 PM