कुटुंब व बाल कल्याण योजनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सरनाईक यांची भेट घेऊन कुटुंब व बाल कल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर सुरवातीपासून खूप मोठा अन्याय झाल्याची सांगितले. यावेळी सरनाईक यांनी या प्रकरणाची आपल्याला कल्पना असल्याचे सांगितले. कुटुंब व बाल कल्याण योजनेच्या सेवानिवृत्तांना सातवा वेतन आयोग लागू करून खूप मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे आपण कुटुंब व बाल कल्याण योजनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग त्वरित लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सरनाईक यांनी संबंधित योजना कर्मचाऱ्यांना शासनाने पाचवा वेतन तब्बल बारा वर्षे उशिरा दिला, तर सहावा वेतन साडेपाच वर्षानंतर त्यांना लागू करण्यात आला असून, सातवा वेतनसुद्धा अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेला नाही. या सर्व बाबींची आपणास जाण असून आपण पाचव्या व सहाव्या वेतनाच्या थकीत रकमेची मागणी तसेच सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून राज्यातील कुटुंब व बाल कल्याण योजनेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार किरणराव सरनाईक यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनावर हुकूमचंद बागरेचा ,सुशीला गोटे, वाय.पी.अडागळे, लीला बक्षी, प्रभा पाटील, शशिकला देशपांडे, लीला पोहरे, पंचफुला नाथे, नलिनी गोस्वामी, छाया लामखांडे, मंदा देशमुख, लीला पुरी, अश्विनी खन्ना, निर्मला बागरेचा, संध्या आढाव, कौशल्या काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर, नारायणराव काळबांडे, प्रा.डॉ.दादाराव देशमुख आदी उपस्थित होते .