वाशिम : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एका कर्मचाऱ्याला विभागांतर्गतची (डिपार्टमेंटल) परीक्षा उत्तीर्ण न करतानाच पदोन्नती दिल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. काही विशिष्ट अटींवर ही पदोन्नती दिली असून, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.
शासकीय सेवेचा विशिष्ट कालावधी पूर्ण करणे आणि जिल्हा सेवा प्रवेशोत्तर (डिपार्टमेंटल) परीक्षा चार वर्षात तीन संधींमध्ये उत्तीर्ण करणाऱ्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा लाभ दिला जातो. शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात पदोन्नती करण्यात यावी, असे नियमानुसार अपेक्षित आहे. मार्च २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. तत्पूर्वी बांधकाम विभाग, पदोन्नती समिती, सामान्य प्रशासन विभाग आदी विभागातून पदोन्नतीच्या या फाइलचा यशस्वी प्रवास झाला. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर, बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश औतकर यांच्या कार्यकाळात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या पदोन्नती प्रक्रियेतील काही किस्से आता समोर येत आहेत. काही अटी, शर्तीवर एका कर्मचाऱ्याला विभागांतर्गतची परीक्षा उत्तीर्ण न करताच पदोन्नती दिल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याने कुठेतरी पाणी तर मुरत नाही ना, अशी चर्चाही रंगत आहे. दरम्यान, शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढणे अपेक्षित असते. मार्च २०२१ या महिन्यात जिल्हा परिषदेचे अन्य विभागवगळता बांधकाम विभागात पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. तत्कालीन कार्यकारी अभियंता औतकर यांनी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पदोन्नतीची फाइल निकाली काढली.
००
कोट बॉक्स
बांधकाम विभागातील पदोन्नती प्रक्रियेविषयी मला काही माहिती नाही. मी प्रभार घेण्यापूर्वीचे पदोन्नतीचे हे प्रकरण आहे. तरी याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल.
- ए.एम. खान
प्रभारी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
जिल्हा परिषद वाशिम.
००००
पदोन्नती समितीत पाच जणांचा समावेश असतो. पदोन्नतीबाबतचा निर्णय हा पदोन्नती समितीतील सदस्य घेत असतात. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर पदोन्नती दिली जाते. बांधकाम विभागातील पदोन्नतीबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर नेमके काय प्रकरण आहे ते सांगता येईल.
- विवेक बोंद्रे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन, जिल्हा परिषद, वाशिम
००००
बांधकाम विभागातील पदोन्नती प्रक्रियेविषयी माहिती घेतली जाईल. चौकशीअंती चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झाल्याचे निदर्शनात आले तर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
- वसुमना पंत
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम