जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत असून जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पातळीवरील पॅनल प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गत आठवड्यापासून ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडत आहे. ‘एकदा संधी देऊन तर बघा...’, ‘तुमचे विकासस्वप्न आम्ही साकार करणार’ यासारखी स्वप्ने दाखवत मतदारांना सामोरे जाणाऱ्या उमेदवार व पॅनल प्रमुखांचा जाहीर प्रचार बुधवारी थांबला. प्रचाराची रणधुमाळी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रभातफेऱ्या, वाहनांवरील जाहीर प्रचार थंडावला असून, आता गुप्त प्रचारावर भर देण्यात येणार आहे. मतदानापूर्वीच्या दोन दिवसांत जय-पराजयाचे गणित मांडत राजकीय घडामोडींना वेग येतो. दिग्गजांच्या डावपेचात कुणाचा गेम होणार आणि कुणाला संधी मिळणार याचा निकाल १८ जानेवारी रोजी मतमोजणीतून समोर येईल.
००
बॉक्स
छुप्या प्रचाराला वेग
सार्वजनिक प्रचाराची मुदत संपल्यानंतर खासगी भेटीगाठी आणि वैयक्तिक स्वरूपाच्या प्रचाराला वेग आल्याचे दिसून येते. छुप्या पद्धतीने प्रचाराचा फंडा सगळ्याच पॅनल प्रमुख व उमेदवारांकडून वापरण्यात येत असून रात्री-अपरात्रीही मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. प्रचार संपल्यानंतर वैयक्तिक टीका थांबली असली तरी छुप्या प्रचारातून अनेकांना आपल्याकडे वळवण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येते.
०००००
मतदान होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
तालुकाअविरोधमतदान
वाशिम ०५ १९
रिसोड ०२ ३२
मालेगाव ०२ २८
मं.पीर ०० २५
कारंजा ०१ २७
मानोरा ०१ २१
एकूण ११ १५२