कोंडाळामहाली : गावातील मालमत्तेच्या नमुना ८ अ, फेरफार नोंदीबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, सदर मालमत्तेची फेरफार नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये लाभार्थीने मालमत्ता क्रमांक ९९ चे मालमत्ताधारक देविदास पांडूरंग भोसले यांच्या जागेचा नमुना ८ अ कोणत्या आधारे बनविण्यात आला, त्याबाबत फेरफार व नोंदीची माहिती शासकीय माहिती अधिकारी तथा कोंडाळा महाली गट ग्राम पंचायतचे सचिव नारायण महाले यांचेकडे १८ जानेवारी रोजी एका अर्जाद्वारे मागितली होती. विहीत मुदतीमध्ये त्यांनी माहिती दिली नसल्यामुळे २ मार्च २०१७ रोजी जोडपत्र ब नुसार गटविकास अधिकारी वाशिम यांचेकडे अपिल केले होते. या अपिलावर २७ मार्च रोजी सुनावणी झाली. यावेळी ग्रामपंचायत सचिव एन.के. महाले यांनी ग्रा.पं. कार्यालयामध्ये फेरफार व नोंदीबाबत रेकॉर्ड उपलब्ध नाही असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. ग्राम पंचायत व देविदास भोसले यांनी संगनमत करुन सदर जागेची नमुना ८ अ मधील लांबी रुंदी ही खोटी बनविली असल्याचा आरोप माहिती अधिकारकर्ते गावंडे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केला.-----------------सदरची माहिती बाबत अर्ज आपणास प्राप्त झाला आहे. ही माहिती शासन दरबारी उपलब्ध नसून याबाबत तुम्ही पोलिसात तक्रार करा व कोर्टात केस दाखल करा.- व्हि.के. खिल्लारे (विस्तार अधिकारी), पंचायत विभाग, पं.स.वाशिम------------------सदर माहितीबाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फेरफार व नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. - नारायण किसन महाले (सचिव), ग्राम पंचायत, कोंडाळा महाली
ग्रामपंचायतमध्ये मालमत्ता धारकाचे रेकॉर्डच उपलब्ध नाही !
By admin | Published: April 01, 2017 5:00 PM