ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना स्वयंमूल्यांकनाच्या आधारे पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत विभागाने केले होते. यासाठी ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्तीसाठी १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत केलेली कामे आणि उपाययोजना लक्षात घेतल्या जाणार असून, प्रस्ताव सादर करण्यापूर्वी ग्रामपंचायतने पाच निकषांवर काम करायचे आहे, त्यामध्ये कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष पथक, कोरोना तपासणीसाठी वाहनचालक पथक, कोविड हेल्पलाइन पथक, लसीकरण पथक यांचा समावेश आहे. ज्या ग्रामपंचायतने नियमानुसार काम केली त्यांचे निवडक प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविले जातील, अशी माहिती पंचायत विस्तार अधिकारी संजय भगत यांनी दिली.
----------------
केवळ सात ग्रामपंचायतींना कोरोनामुक्तीची प्रतीक्षा
मानोरा तालुक्यात एकूण ७७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ७० ग्रामपंचायतींनी कठोर उपाययोजना करून गावे कोरोनामुक्त केली आहेत. त्यामुळेच या ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी पंचायत समितीकडे प्रस्तावही सादर केले आहेत. आता पूर्णपणे कोरोनामुक्त न झालेली केवळ सात ग्रामपंचायती तालुक्यात असून, या ग्रामपंचायतीही कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना करीत आहेत.