रिसोड- स्थानिक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समता फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेला अधिक गतिमान करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम २० जूनला समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. लस घेऊन सामाजिक आरोग्य जपण्याचा सल्ला ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऋषींवटरत्न पुरुषोत्तम अग्रवाल, प्रमुख अतिथी संजय उकळकर, पंजाबराव नाना देशमुख, संतोष वाघमारे, समताचे आरोग्य विभाग प्रमुख तान्हाजी गोंड, प्रियांका घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील १८ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. नगर परिषद व खासगी हॉस्पिटलच्या सहकार्याने समता फाऊंडेशनने ५ जून ते २० जून या कालावधीत शहरातील १३ हजार नागिरकांचे लसीकरण पूर्ण केले
परंतु आणखी बऱ्याच नागरिकांची लस घेणे बाकी आहे. त्यासाठी पुरुषोत्तम अग्रवाल स्वतः वेळ देऊन शहरातील सामाजिक, शासकीय, धार्मिक व आध्यात्मिक संस्थांना भेट देऊन लसीकरण मोहिमेला सहकार्य करून लस घेण्याची विनंती करीत आहेत. शहरातील सिव्हिल लाईनस्थित ओम शांती संस्कार भवन या ब्रह्माकुमारीज विद्यालयाला भेट देऊन तेथील ज्ञानार्थीशी पुरुषोत्तम
अग्रवाल यांनी संवाद साधला आणि रिसोड शहरातील प्रत्येक नागरिकाने लस घेतली पाहिजे यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यालयाच्यावतीने पुरुषोत्तम अग्रवाल यांच्यासह सर्व मान्यवरांचा ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी शाल व लक्ष्मीनारायणची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी लसीकरण मोहिमेबाबत तान्हाजी गोंड, संजय उकळकर, संतोष वाघमारे, पंजाबराव देशमुख या मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी गीता दीदी, ब्रह्माकुमारी वंदना दीदी यांच्यासह ज्ञानार्थीचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवी अंभोरे यांनी केले.
०००००
नागरिकांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम
समता फाऊंडेशन नागरिकांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवित असते. लोकांच्या आरोग्यविषयक बाबींची विशेष काळजी घेतली जाते. शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम काही वर्षांपासून राबविला जात आहे. त्यामुळे संपूर्ण रिसोड शहरात मोठ्या प्रमाणात झाडांचे जतन झाले आहे. विद्यालयासमोरसुद्धा हिरवीगार दिसणारी झाडे ही त्याच उपक्रमातील आहेत. समता फाऊंडेशनच्या कोणत्याही लोककल्याणकारी उपक्रमात ब्रह्माकुमारीज ओम शांती परिवार सहभागी असतो. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी ज्योती दीदींनी उपस्थित सर्व ज्ञानार्थींना सूचित केले. लसीकरण मोहीम सामाजिक ऋण समजून यशस्वी करावी. शहरातील नागरिकांनी लस घेण्यासंदर्भात स्वतःहून समोर येऊन हे राष्ट्रीय आणि ईश्वरीय कार्य समजून लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले.