कोरोना महामारीमुळे देशभरामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लाॅकडाऊनमुळे मागील एक वर्षापासून आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. या बेरोजगारीवर कोणताही पक्ष, कोणतेही संघटन कोणत्याही प्रकारचा आवाज उठवताना दिसत नाही. भारतीय बेरोजगार मोर्चाने याची गंभीरता लक्षात घेऊन वाढणारी बेरोजगारी आणि सरकारची उदासीनता या विरोधामध्ये ८ मे रोजी मानोरा येथे काळी पट्टी निषेध आंदोलनचे आयोजन केले होते. जोपर्यंत नोकरभरती होत नाही, तोपर्यंत सुशिक्षित युवा बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, ठेकेदारी पद्धत बंद करून पूर्ववत सरकारी भरती सुरू करावी, युवा व बेरोजगारांच्या वयाची अट संपण्याच्या आधी नोकर भरती पूर्ण करावी, रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, सर्व प्रकारच्या नोकरभरतीमध्ये महिलांना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावे आदी मागण्या भारतीय युवा व बेरोजगार मोर्चा मानोराच्या वतीने केल्या.
सरकारला जागे करण्यासाठी या आंदोलनाचा दुसरा टप्पा १२ मे रोजीईव्हीएमची प्रतिमा जलाओ आंदोलन केले जाणार आहे. शनिवारच्या या काळीपट्टी निषेध आंदोलनामध्ये मानोरा तालुक्यातील भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ, भारत मुक्ती मोर्चा इत्यादी संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.