लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील सिंगडोह-जोगलदरी या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असल्याने ग्रामस्थांना त्रास होत आहे. वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्ती न झाल्याने अखेर सिंगडोहवासियांनी मानोरा-मंगरुळपीर मार्गावर जोगलदरी फाट्यानजिक शुक्रवारी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास ठप्प झाली होती. सिंगडोह (सिंगणापूर) ते जोगलदरी फाटा या ३ किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण रस्त्याचे काम २००१ मध्ये झाले होते; परंतु सदर काम निकृष्ट झाल्यामुळे हा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला. त्यामुळे १६ वर्षांपासून येथील सिंगडोह येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिंगडोह गावाची लोकसंख्या १७०० ते २००० हजार असून, विद्यार्थी, शेतकरी व गावकºयांना मंगरुळपीर व मानोरा येथे येजा करण्यासाठी हाच रस्ता आहे. तथापि, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळणीच झाली आहे. या खड्ड्यांमुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडले आहेत. सिंगडोह येथील बाळ चव्हाण यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शासन, प्रशासन दरबारी मागील वर्षभरापासून पाठपुरावा केला; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांत रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून २ नोव्हेंबर रोजी रास्तारोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार सिंगडोहच्या ग्रामस्थांनी जोगलदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता आठवले यांनी लेखी पत्र देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्ता दुरुस्तीसाठी सिंगडोहवासी रस्त्यावर; २ तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 5:42 PM