मंगरुळपीर: उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे महिलेवरील अत्याचार आणि जम्मू काश्मिरमधील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे मंगळवार १७ एप्रिल रोजी एकता संघाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी एकता संघाच्यावतीने तहसीलदारांमार्फत कें द्र सरकारला निवेदन सादर करून या प्रकरणी द्रूतगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
उन्नाव आणि कठुआ येथील घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित मूकमोर्चासाठी तालुकाभरातील सर्व धर्माचे लोक एकत्रित झाले होते. मंगरुळपीर येथील दादा हयात कलंदर बाबाच्या दर्गाहमधून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दर्गाह चौक परिसरातून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्यमार्गाने शांततेत उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी एकता संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जम्मू काश्मिरमधील कठुआ येथील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाºया नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचार प्रकरणात कोणत्याही आरोपीची गय न करता पिडित महिलेवरील अत्याचार व पिडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील दोषींना मृत्यूदंड व कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करावी. वरील दोन्ही प्रकरणांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ शिक्षणा द्यावी, तसेच पिडित कुटूंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे आणि या प्रकरणांत गुंतलेल्या आरोपींचे मताधिकारही रद्द करावेत, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.