(लोकमत इम्पॅक्ट)
वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी १ जून रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले.
पहिल्या लाटेत जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोना पहिला रुग्ण आढळला होता. रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या जिल्ह्यातील निवासी शाळा व वसतिगृहाच्या इमारती कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर साहजिकच कोविड केअर सेंटरचे दरवाजेही कुलूपबंद झाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने सवड (ता. रिसोड), सुरकंडी (ता. वाशिम), सिव्हिल लाईन वाशिम, मंगरूळपीर, कारंजा येथे कोविड केअर सेंटरचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले; तसेच ग्रामीण भागातही संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या इमारतींमध्ये काही ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत; तर काही कोविड केअर सेंटरच्या काचा, खिडक्यांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने १ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याच मुद्द्याला हात घालून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनीदेखील १ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या आढावा बैठकीत कोविड सेंटर, संस्थात्मक विलगीकरण कक्षात वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. याविषयी संनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.
00०००00
स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
संस्थात्मक विलगीकरण कक्षातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संनियंत्रणासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, वेळोवेळी आढावाही घेण्यात येणार आहे.
00०००00