वाशिम : देशातील बंजारा बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी यात्रा महोत्सवानिमित्ताने भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी १ एप्रिल रोजी प्रशासकीय यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित यात्रा पूर्वतयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.
सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस आदींची उपस्थिती होती. बुवनेश्वरी म्हणाल्या, यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयातून सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. पिण्यासाठी व आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. यात्रेच्या कालावधीत पोहरादेवी येथे आरोग्य विभागाने २४ तास दोन आरोग्य पथके, दोन रुग्णवाहिका तसेच पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. यात्रेदरम्यान २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा.
दर्शन घेतांना भाविकांना अडचण निर्माण होणार नाही याकरीता पोलीस विभागाने बॅरीकेटसची व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण व सुरक्षेकडे पोलीसांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी महंत जितेंद्र महाराज व सुनिल महाराज व शेखर महाराज यांनी यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी मांडून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.