वाशिम : -
कोविड महामारीने संपूर्ण देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. परिणामी कोरोना आजाराला मोठ्या संख्येत नागरिक बळी पडत आहे. यासाठी राज्य शासनाने आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू, गोरगरीब कोविड रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार लखन मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी पाठविलेल्या पत्रात केली आहे.
महाराष्ट्र राज्यात देशातील इतर राज्यापेक्षा कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत असून या रुग्णांना उपचार देण्यात शासकीय वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे
नाईलाजास्तव रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी जरी शासनाने रुग्णांकडून किती शुल्क घ्यावे याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या असल्या तरी अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. अनेक रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना आपली संपत्ती विकून उपचार करावा लागत आहे व अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात प्रवेश न मिळत असल्यामुळे दगावत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगमोहन रेड्डी यांनी त्यांच्या राज्यामधील कोविडच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये शासनाच्यावतीने मोफत उपचार करण्याबाबत घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील गरीब जनतेचे हित लक्षात घेता त्यांनाही चांगला उपचार मिळावा याकरिता खाजगी रुग्णालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरजू, गोरगरिबांना मोफत उपचार देण्यात येईल अशी घोषणा तत्काळ करावी व याचा अध्यादेश काढून सर्व खाजगी रुग्णालयांना कळविण्यात यावे अशी मागणी आमदार मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.