वाशिम - पोषण अभियानांतर्गत मालेगाव पंचायत समितीच्यावतीने गुरुवारी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा घेऊन उपस्थितांना पोषण अभियानसंदर्भात शपथ दिली.यावेळी महिला व बाल कल्याण सभापती यमुना जाधव, पंचायत समिती सभापती मंगला गवई, उपसभापती ज्ञानबा सावले, जि.प.सदस्य रत्नाप्रभा घुगे, तहसिलदार राजेश वजीरे, गटविकास अधिकारी संदीप कोटकर, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोरशे, गटशिक्षणाधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी हाडोळे, विस्तार अधिकारी मदन नायक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकेतून बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी यांनी तालुकास्तरीय नियोजन व अंमलबजावनीबाबत माहिती दिली. गटविकास अधिकारी कोटकर यांनी पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरुप देवून सर्व विभागांनी एकत्रीत येवून पोषण अभियानांतर्गत आठवडानिहाय नियोजनानुसार कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. तहसिलदार राजेश वजीरे यांनी ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके तसेच गरोदर, स्तनदा महिला व किशोरवयीन मुली या गटामध्ये प्रामुुख्याने पोषण आहाराबाबत जनजागृती करून प्रत्येक घरी याबाबत चळवळ उभी राहील या करिता सर्वांनी एकत्र लढा द्यावा, असे आवाहन केले. जि.प. सदस्य रत्नप्रभा घुगे यांनी जुन्या चालिरिती व अनिष्ट प्रथा मोडीत काढून विज्ञान शिक्षणावर लक्ष केंद्रत करून पोषणावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले. विस्तार अधिकारी मदन नायक यांनी सर्वांना सार्वत्रिक पोषण अभियानाची शपथ दिली. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पोषण अभियानाच्या चित्ररथ व प्रभात फेरीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. रॅलीत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मालेगाव तालुक्यात पोषण आहारासंदर्भात जनजागृती !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:08 PM