मंगरुळपीर: आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्चपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पोलीओमूक्त भारताच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी मंगरुळपीर येथील राजस्थानी महिला मंडळाने पुढाकार घेतला असून, शहरात ठिकठिकाणी त्याबाबत जनजागृती करण्यासह बालकांना पोलिओ पाजण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यात रविवार ११ मार्च रोजी सकाळपासून सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कलावधीत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ८१९; तर नागरी भागात १२५ असे एकंदरित ९४४ बुथ स्थापन करण्यात आले आहे. या अंतर्गत मंगरुळपीर शहरातील नावंदर वाडी परिसरात बुथ क्रमांक १२वर अंगणवाडी सेविका अलका हिंबर यांनी पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी राजस्थानी महिला मंडळाने पुढाकार घेतला. मंडळाच्या अध्यक्षा कविता मालपाणी, सचिव कविता बाहेती, सहसचिव निशा धूत यांच्यास इतर सदस्यांनी परिसरात फिरून पालकांना पल्स पोलिओ मोहिमेचे महत्त्व पटवून देत बालकांना बुथपर्यंत आणण्यासाठी सहकार्य केले. सोमवार आणि मंगळवारीही राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्यांनी पोलिओ डोजपासून वंचित राहिलेल्या बालकांना त्याचा लाभ देण्यासाठी सहकार्य केले. यासाठी उमा व्यास, सिमा बंग, कल्पना भुतडा, कोमल राठी, माधुरी मोयल यांनी परिश्रम घेतले.