लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : यावर्षी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरूवात झाल्याने लांबणीवर पडलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ लाख ५४ हजार डोज प्राप्त झाले असून १ लाख २२ हजार ३५७ बालकांना डोज देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ४१ हजार ५६३ असून सुमारे २ लाख ४४ हजार ४७४ घरे आहेत. शहरी भागात ३४ हजार ९२१ आणि ग्रामीण भागात ८७ हजार ४६३ असे एकंदरीत १ लाख २२ हजार ३५७ बालके शून्य ते पाच वयोगटातील आहेत. त्या सर्वांना येत्या ३१ जानेवारी रोजी पोलिओचा डोज दिला जाणार आहे. या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९७५ बुथवर पोलिओ डोज दिला जाणार आहे. या मोहिमेसाठी १४५ आरोग्य सेवक, १९७ पर्यवेक्षक, २५ आरोग्य संस्था, ३० मोबाईल पथक आणि १३९ ट्रान्झिस्ट पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. ३१ जानेवारी रोजी पोलिओ बुथवर न आलेल्या बालकांना २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षणातून शोध घेऊन पोलिओचा डोज पाजला जाणार आहे. त्यासाठी १७१५ कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत राहणार आहे. सदर मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय विभाग व जनतेचा सहभाग आवश्यक आहे. सहा तालुक्यांसाठी सहा खातेप्रमुख नियुक्त करण्यात आले असून, गट विकास अधिकारी यांना प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोना लसीकरण मोहिमेमुळे विलंब झालेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेस ३१ जानेवारीपासून सुरूवात केली जात आहे. त्यासाठी ९७५ बुथ कार्यान्वित करण्यात आले असून त्यावर शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज दिला जाणार आहे. याशिवाय जी बालके यादिवशी डोस घेणार नाहीत, त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन डोस दिला जाणार आहे.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम