मानोरा : तालुक्यासह परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड यांनी शनिवारी केली आहे.
गत चार दिवसांत मानोरा तालुक्यात संततधार पाऊस झाला. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी तालुक्यातील रुई-गोस्ता या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आधीच सततची नापिकी, त्यात यावर्षी शेतीच्या बी-बियाणे व खताच्या किमतीत वाढ झाली. खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि आता अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.
०००
.. तर आंदोलनाचा इशारा
अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही मानोरा तालुक्यात पंचनामे करण्यात आले नाही, असा आरोप मनोहर राठोड यांनी केला. तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राठोड यांनी दिला आहे.