कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांमार्फत नियोजनबद्ध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व दुकानांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत २ पथके स्थापन करण्यात आली आहेत, तसेच पोलीस विभाग, ग्रामस्तरीय समितीमार्फतही दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत.
नगरपरिषदेच्या पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्या २४ व्यक्तींवर, तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रकरणी एका दुकानावर दंडात्मक कारवाई केली. यामधून १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाने मास्क न वापरणाऱ्या ४५ व्यक्तींवर शनिवारी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये २२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ग्रामीण भागात मास्क न वापणाऱ्या व्यक्तींकडून शनिवारी दिवसभरात ११ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.