लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मास्कचा वापर न करणे आणि ट्रिपल सीट या प्रकरणी १ ते ५ एप्रिल अशा पाच दिवसांत वाशिम शहर वाहतूक शाखेने ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत वाशिम शहरात अनेक दुचाकीस्वार मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येते, वाशिम शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोेडण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. एकिकडे कोरोना संसर्ग वाढत असताना दुसरीकडे अनेकजण विनामास्क तसेच दुचाकीवर तिबल सीट फिरतात. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नाही. मास्क, रुमालचा वापर न करणाºयांंविरूद्ध शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहिम सुरू केली. पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अकोला नाका, पोस्ट ऑफिस चौक, पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका आदी ठिकाणी कारवाईची मोहिम राबविली जात आहे. १ ते ५ एप्रिल या दरम्यान जवळपास २०० दुचाकीचालकांनी मास्क न वापरल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे १ लाख रुपये दंड आकारला तसेच तिबल सीट वाहन चालविल्याप्रकरणी २०० जणांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला. यापुढेही चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न बांधता शहरात वाहन चालविताना कुणी आढळून आले तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नागेश मोहोड यांनी दिला.(प्रतिनिधी)
वाशिम शहरात पाच दिवसांत ४०० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:18 PM