लोकमत न्यूज नेटवर्ककोंडाळा महाली: राजस्थानमधील बारीशवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे आनंदराज ऊर्फ जयहरी महाराज यांनी पाऊस यावा यासाठी वाशिम तालुक्यातील सोयता येथील प्रवेश राऊत यांच्या शेतामध्ये १९ जूनपासून अन्नत्याग करीत व मौनव्रत धरून देवाला साकडे घातले आहे. मूळचे पुणे येथील रहिवासी असलेले आनंदराज महाराज यांनी ३० वर्षांपासून घराचा त्याग केला असून, त्यांची सतत भ्रमंती सुरू आहे. ते २००५ मध्ये विदर्भात आले त्यानंतर ते काही वर्षे सोयता येथे रघुनाथ स्वामी संस्थानवर राहिले. त्यांनी सलग तीन वर्षे सोयता येथे अखंड हरिनाम व श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानंतर ते राजस्थानमध्ये गेले. राजस्थानमध्ये त्यांनी पावसासाठी अनेक वेळा तपस्या केली. तेथे ते बारीशवाले बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. ते राजस्थानमधून ३० मे रोजी पुन्हा विदर्भात आले. अशातच जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकू लागली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची चिंता बारीशवाले बाबांना दिसली. त्यांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी १९ जूनपासून अन्नत्याग करून मौन धरले आहे, तसेच पाऊस पडेपर्यंत स्नान न करण्याचाही त्यांनी संकल्प केला आहे. भर उन्हात उभे राहून त्यांची तपस्या सुरू आहे.
पावसासाठी ‘बारीश’वाले बाबांची तपस्या!
By admin | Published: June 26, 2017 10:08 AM