लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘नाफेड’च्या खरेदीला मुदतवाढ मिळाली असली तरी, निधीअभावी खरेदी उधारीवरच सुरू आहे. नाफेडला दीड महिन्यापूर्वी तूर विकलेल्या हजारो शेतकऱ्यांना अद्याप चुकारा मिळालेला नाही. त्यामुळे ‘नाफेड’ची खरेदी ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशीच ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा, या उद्देशाने शासनाकडून करण्यात येत असलेली शासकीय तूर खरेदी फायद्याऐवजी अडचणीचीच असल्याचे सिद्ध होत आहे. खरेदीसाठी, मोजणीसाठी विलंब आणि विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्यासाठीही तेवढाच विलंब, अशा विविध समस्यांचा सामना शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना करावा लागत आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना पैसा अडका हाती असावा, म्हणून शेतकरी तूर विकण्यासाठी धडपड करीत आहेत; परंतु नाफेडच्या केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना महिना-महिना चुकाराच मिळत नसल्याने ही तूर खरेदी शेतकऱ्यांना अडचणीतच टाकत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ‘आरटीजीएस’ पद्धतीने शेतकऱ्यांचे चुकारे करण्यात आले. मालेगाव येथे १७ मार्चपर्यंत नाफेडने ११ हजार ४०० क्विंटल खरेदी केली. त्यातील सर्व ५४० शेतकऱ्यांना मागील महिन्यात चुकारे अदा केले. तर ६ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन मंडळाने खरेदी केलेल्या ३ हजार ५९९ क्विंटल तुरीचे चुकारे करण्यासाठी आता निधी प्राप्त झाला आहे. त्याशिवाय २९ एप्रिल ते १६ मे पर्यंतच्या काळात या ठिकाणी २८० शेतकऱ्यांकडून ६ हजार ७७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांचे चुकारे करण्यासाठी मात्र अद्याप निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगरुळपीर येथील शासकीय खरेदी केंद्रावर नाफेडने आतापर्यंत २७ कोटी ७० लाख रुपयांची ५५ हजार ३० क्विंटल तूर खरेदी केली. त्यापैकी १० कोटी २१ लाख प्राप्त झाले तर ६ कोटी ३२ लाख रुपयांचे चुकारे देणे बाकी आहेत. याशिवाय मध्यंतरी महाराष्ट्र पणन संघाने २९ एप्रिल ते ८ मे पर्यंत ३ कोटी १० लाख रुपयांची ७ हजार ३३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्याचे चुकारेही बाकी आहेत. मंगरुळपीर येथील शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांपैकी १ हजार २३४ शेतकऱ्यांचे १० कोटी २ लाख रुपयांचे चुकारे अद्याप बाकी आहेत. कारंजा तालुक्यात नाफेडकडून एप्रिल २२ पर्यंत २१२८ शेतकऱ्यांकडून एकूण १८ कोटी ५६ लाख ५३ हजार ५५० रुपयांची ३६ हजार ७७१ क्विंटल तूर खरेदी केली. त्यातील १७३६ शेतकऱ्यांना १५ कोटी ३२ लाख ६९ हजार ७९३ रुपयांचे चुकारे करण्यात आले, तर त्यातील ३९२ शेतकऱ्यांचे ३ कोटी २४ लाख २३ हजार ७५७ रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत. वाशिम येथे २२ एप्रिलपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या एकूण शेतकऱ्यांपैकी ५९ शेतकऱ्यांचे ५२ लाख ५१ हजार २९१ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. त्याशिवाय याठिकाणी महाराष्ट्र पणन मंडळाने ८ मे पर्यंत २१९ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ३९७७ क्विंटल तुरीचे, तसेच त्यानंतर आजवर नाफेड आणि पीपीएस संस्थेने ३१ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ६०९ क्ंिवटल तुरीचे चुकारे बाकी आहेत. यावरून जिल्ह्यात शासनाकडून तुरीची खरेदी करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना विकलेल्या तुरीचे चुकारे मिळण्यास महिनाभराचा विलंब लागल्यास खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. जिल्ह्यातील नाफेड किंवा शासकीय खरेदी केंद्रात तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेशाने चुकारे केले जात आहेत. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे चुकारे देणे बाकी असले तरी, ते लवकरच अदा करण्यात येतील. शासनाकडून तशी तरतूद करण्यात आली आहे. -ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक वाशिम
निधीअभावी ‘नाफेड’ची खरेदी उधारीवरच!
By admin | Published: May 17, 2017 1:48 AM