लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): वाशिम जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथे मराठवाड्यातील व्यापारी हळद खरेदीसाठी दाखल झाले आहेत. हे व्यापारी ५४०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल दराने हळद खरेदी करीत आहेत. शिरपूर येथे हळद खरेदीची सुविधा नसल्याने मराठवाड्यातील व्यापाºयांमुळे हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.वाशिम जिल्ह्यात हळदीची सर्वाधिक लागवड शिरपूर जैन परिसरात होते. जवळपास ६०० पेक्षा अधिक शेतकरी या परिसरात १५०० एकरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड करतात. सिंचनाच्या सुविधा, योग्य व्यवस्थापनामुळे या भागात हळदीचे उत्पादनही चांगले होते. यंदाही शिरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच या हळदीची काढणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीची हळद खरेदी करून पुढच्या तयारीसाठी मराठवाड्यातील व्यापारी शिरपुरात येत आहेत. यात रविवार ३ जानेवारी रोजी मराठवाड्यातील शिरड, शहापूर येथील व्यापाºयांनी शेतकºयांकडे शिल्लक असलेल्या हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दरम्यान, शिरपूर येथे लाखो क्विंटल हळदीचे उत्पादन होत असतानाही बाजारात या शेतमालाच्या खरेदीसाठी योग्य सुविधा नाही. परिणामी, येथील शेतकºयांना वाशिम किंवा हिंगोली येथील बाजारपेठेत हळद न्यावी लागत होती. आता मात्र मराठवाड्यातील व्यापारीच येथे हळद खरेदीसाठी येऊ लागल्याने हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत दर कमीशिरपूर परिसरातील शेकडो शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतात. या पिकासाठी त्यांना एकरी ४० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. त्या तुलनेत हळदीला दर मात्र मिळत नाहीत. सद्यस्थितीत मराठवाड्यातील व्यापारी गतवर्षीची हळद ५४०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. गावातच हळद खरेदी होत असल्याने शेतकºयांचा खर्च वाचला असला तरी, हळदीला लागवड खर्चाचा विचार करता किमान ७५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळावेत, अशी अपेक्षा शिरपूर येथील हळद उत्पादक शेतकरी दिलिपराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील व्यापाऱ्यांकडून शिरपुरात हळद खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 5:22 PM