वाशिम : जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायत निवडणूकपैकी ९ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५४ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व एका ग्रामपंचायत पोटनिवडणूक ४ आॅगस्ट रोजी ७३.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी पार पडली. मतमोजणी सुरु असतांना ग्रामस्थांमध्ये उत्सुकता, अन उत्साह दिसून आला. निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर पराभूत उमेदवारांच्या गटात नाराजी दिसून आली.वाशिम तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमधील १८३ , रिसोड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीमधील २९०, मालेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीतील २०६ , कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीतील २१४, मानोरा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतील १६२ व मंगरूळपीर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीतील १७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांची आज मतमोजणी केली असता अनेक दिग्गजांचा यामध्ये पराभव तर अनेक तरुणांचा नव्याने समोवश झाला. मानोरा तालुक्यातील २० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यात अनेक मातब्बर पुढाऱ्यांना व त्यांच्या गटाला घरचा रस्ता दाखवित मतदारांनी मोठ्या प्रमाणात परिवर्तन करुन दिग्गजांचे किल्ले उध्वस्त केले. कारंजा तालुक्यामध्येही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उलथा पालथ झाली. वाशिम तालुक्यातील अनसिंग, तोंडगाव, काटा गा्रमपंचायत निवडणुकीत परिवर्तन झाले. अनसिंग मध्ये १० वर्षापासून सत्ता असलेल्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. काटा व तोंडगाव येथेही परिवर्तन घडले. निवडणुक निकालाने सर्वत्र जल्लोष दिसून आला.