- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन पुन्हा एकवेळ सज्ज झाले आहे. दुकाने, एस.टी., खासगी वाहने थांबवून त्यात पोलिसांकडून धाडसत्र अवलंबिण्यात आले आहे. तोंडाला मास्क न दिसल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. रस्त्यांवरही कारवाईची ही मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तोंडाला मास्क लावा किंवा दंड भरण्यासाठी खिशात किमान ५०० रुपये ठेवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात मध्यंतरीच्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख खालावला होता. त्यामुळे प्रशासनाने बहुतांश निर्बंध शिथिल करत केवळ लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू ठेवल्या. गेल्या काही दिवसांपासून मात्र पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने अधिक तीव्रतेने डोके वर काढले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची भर पडली आहे. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने सक्तीची पावले उचलत पुन्हा कठोर नियम लागू केले आहेत. त्यानुसार, नागरिकांनी सदोदित तोंडाला मास्क परिधान करणे, सामाजिक व शारीरिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी वारंवार आवाहन करूनही अनेक जण नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या धाडसत्र अवलंबून नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एस.टी. बस, खासगी वाहने, कपड्यांची व अन्य साहित्य विक्रीची दुकाने यांसह सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क घातलेले आढळले नाही तर ५०० रुपये दंड ठोठावला जात आहे. यामुळे विना मास्क प्रवास करणारे व गावभर फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
पाेलीस, महसूल पथकाने पुसद-अकोला एस.टी.बस थांबविली पातुरात शनिवारी सकाळी ९ वाजता वाशिममार्गे पुसदवरून अकोला जाण्याकरिता निघालेली एस.टी. बस पातूर येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांच्या पथकाने थांबविली. प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून असलेल्या या बसमध्ये अनेकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल लावलेला नव्हता. संबंधितांकडून दंडाची रक्कम वसूल करत त्यांना जागीच रितसर पावतीदेखील देण्यात आली. अचानक पडलेल्या या धाडीमुळे नियम तोडणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले.
तीनच दिवसांत ११५९ जणांवर कारवाईकोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न वापरणाºया जिल्ह्यातील ११५९ जणांवर गेल्या तीन दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून सुमारे ४ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.