- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतातील सर्वच राज्यांमध्ये गत काही वर्षांत अन्य वस्तूंप्रमाणेच आरोग्याशी थेट संबंध येत असलेल्या विविध स्वरूपातील औषधीही ‘आॅनलाईन’ स्वरूपात मिळत आहे. हे योग्य की अयोग्य, आपल्या देशात आणि परदेशातील औषध विक्रीतील फरक काय, या व तत्सम अन्य विषयांवर ४५ दिवस अमेरिकेत वास्तव्य करून तेथील औषध विक्रीचा अभ्यास करून परतलेले तथा ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून औषध विक्रीच्या व्यवसायात असलेले केमीस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे विद्यमान अमरावती विभागीय सचिव नंदकिशोर झंवर यांच्याशी साधलेला हा संवाद...
परदेशातील औषध विक्रीची पद्धत नेमकी कशी आहे?औषध ही जीवनावश्यक तथा थेट आरोग्याशी, जीवन-मरणाशी निगडित बाब असल्याने त्यातील नियम, कायद्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे; मात्र भारतात आॅनलाईन औषध विक्रीचे प्रस्थ हल्ली वाढल्याने सर्व नियम गुंडाळून ठेवले जात आहेत. आपल्या देशात कुणालाही सहज कोणतीही औषधी उपलब्ध होते. अमेरिकेत कुठलीच औषधी कुणालाच सहजरित्या उपलब्ध होत नाही. तेथे एका ठराविक पद्धतीनेच औषध उपलब्ध होते. डॉक्टरांकडे जाणाºया रुग्णाच्या हाती औषधीची चिठ्ठी मिळत नाही; तर डॉक्टरांकडून थेट मेडिकलकडे ‘आॅनलाईन प्रिस्क्रीब्शन’ पाठविले जाते. त्याठिकाणी संबंधित रुग्णाने ओळख पटवून दिल्यानंतर औषध मिळते. फार्मसिस्टशिवाय अन्य कुणीही औषध विक्री, डोजेसची हाताळणी करित नाही. आपल्या देशात मात्र साध्या अंगणवाडी सेवकांनाही शासनाकडून औषध हाताळणीचे अधिकार दिले जात आहेत, ही शोकांतिका होय.
आॅनलाईन पद्धतीने औषध मिळते का?अमेरिकेसारख्या विकसनशिल देशात आॅनलाईन औषध विक्रीची कुठलीच पद्धत नाही. भारतात औषधांच्या किमती अत्यंत कमी आहेत. त्यातुलनेत तिथे अफाट किंमती आहेत; मात्र औषधांच्या गुणवत्तेची चाचणी काटेकोरपणे केली जाते. ‘झीनटॅक’ या गोळीमध्ये कर्करोगकारक पदार्थ आढळून आल्याचे अमेरिकेने जाहीर केल्यानंतर भारतात त्या दिशेने तपासणी सुरू झाली, हे त्याचे मोठे प्रमाण असल्याचे मी मानतो.
अमेरिकेत मेडिकल्स कसे चालतात ?अमेरिकेत मुळात भारताप्रमाणे मेडिकल्सची संकल्पनाच नाही. तिथे औषधांचा चेन शॉपीज मॉल आहेत. वॉलगीन फार्मसी, वॉलमार्ट फार्मसी, सी.व्ही.सी. फार्मसी यासारख्या मॉलचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. ग्राहक औषधांबाबत जागरूक आहे.