लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा आवश्यक उपाययोजना करीत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच परदेशातून परत आलेल्या नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय परिसरातील शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आला आहे. या दोन्ही वार्डची २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, डॉ. पवार, डॉ. मडावी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक यांनी सर्वप्रथम क्वारंटाईन वार्डची पाहणी केली. या वार्डमध्ये ५० व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्याची क्षमता आहे. सध्या बाधित देशातून परत आलेल्या ५ व्यक्तींना वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणालाही अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसून सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती क्वारंटाईन वार्डचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी दिली.वार्डमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा यावेळी जिल्हाधिकाºयांनी घेतला. तसेच आवश्यकता भासल्यास वार्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन करावे. वार्डमध्ये नियुक्त सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ६ बेडचा स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून आवश्यक औषधी, सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास खाजगी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी यावेळी दिली. ‘कोरोना’चा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र तरीही आरोग्य विभागाने आवश्यक सज्जता ठेवावी. याकरिता आवश्यक सामग्री, औषधी खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी मोडक यावेळी म्हणाले.
क्वारंटिन, आयसोलेशन वार्डची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 3:32 PM