शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ५ हजार ५५० पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तथापि, शैक्षणिक सत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
----------------------
जुन्या पुस्तकांचे संकलन आवश्यक
शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होईल व झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार २०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. अद्याप जुन्या पुस्तकांचे संकलन झाले नाही. त्यामुळे शिक्षकांनी घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन केल्यास अनेक विद्यार्थ्यांना वितरित करता येणार आहेत.
--------------
अध्ययन, अध्यापन कसे करणार?
यंदाच्या शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली असली तरी शाळांत शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने धडे देण्याच्या सूचना आहेत. तथापि, विद्यार्थ्यांकडे अद्याप पाठ्यपुस्तकेच नसल्याने शिक्षक अध्यापन करणार कसे आणि विद्यार्थी ऑनलाइन वर्गात अध्ययन करणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी गतवर्षीच्या पुस्तकांचा आधार विद्यार्थ्यांना शोधून अभ्यासासाठी वापरता येणार आहे; परंतु यासाठी जावे कोणाकडे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
--------
कोट : यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे; परंतु अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झाला नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन त्यांचे वितरण कसे करायचे, याबाबत नियोजन केले जाणार आहे.
- गजाननराव डाबेराव, प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम
-------------
बॉक्स :
- एकूण विद्यार्थी १,२६,३०१
- पुस्तकांची मागणी ७,०५, ५५०,
------------
तालुकानिहाय विद्यार्थी आणि पुस्तकांची मागणी
तालुका - विद्यार्थी - पुस्तके
वाशिम - २८२३४ - १६०६५९
मालेगाव - १९७४६ - १०९१२९
रिसोड - २५४४० - १४१५४२
मं.पीर - १७३३४ - ९८११२
कारंजा - १९००४ १०४५७५
मानोरा - १६५४३ ९१५३३
---------------------------