पांगरी-अमानी या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यामधील पुलाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पांगरी ते अंमानी या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या नाल्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्यामुळे त्यातून येणारे येणार घाण पाणी गावात शिरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. त्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे तेही रहदारीस घातक ठरत आहे. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव तसेच वाशिम यांच्या अनेक वेळा निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यात अकोला-नांदेड या महामार्गासाठी होणाऱ्या गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गाचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र संबंधित ग्रामपंचायतला दिले असताना त्याबाबतही काही ठाम भूमिका किंवा पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे ही समस्या कधी सुटणार, असा प्रश्न प्रमोद नवघरे, कैलास शिंदे, सीताराम नवघरे, अशोक ज्ञानबा नवघरे, विकास नवघरे, सुधाकर लादे, विलास गोपाळराव नवघरे, अमोल नवघरे, रामेश्वर नवघरे, रमेश नवघरे आदी गावकऱ्यांच्यावतीने उपस्थित केला जात आहे.
--------
पुलावरील पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण
अमानी ते पांगरी नवघरेदरम्यान नाल्यास थोड्याही पावसानंतर पूर येतो आणि पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहते. अमानी आणि पांगरीवासीयांना या मार्गाशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे पुलावरून पाणी वाहतम असतानाही अनेक ग्रामस्थ दुचाकी एकमेकांच्या आधारे पाण्यातून लोटत मार्ग काढतात, तर अनेक ग्रामस्थ एकमेकांचा हात धरून पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करतात, हे चित्र शुक्रवारीही पाहायला मिळाले.
----
कोट: पांगरी नवघरे-अमानी रस्त्याचा प्रश्न नाबार्डकडे पाठवला असून, डागडुजीच्या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. येत्या काही महिन्यांत या निधीतून कामाला सुरुवात करण्यात येईल.
-डी.सी. खारोळे,
उपविभागीय अभियंता,
सा.बां. मालेगाव.