०००००
नियमांचा भंग; ७४ वाहनांवर कारवाई
वाशिम : दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७४ वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली.
०००००
जामदरा तलावाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा
वाशिम : मानोरा तालुक्यातील जामदरा तलावाच्या भिंतीत ‘लिकेज’ असल्याने दरवर्षी हा तलाव कोरडा पडतो. यंदाही या समस्येमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या तलाव दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
००००
डासांचा प्रादुर्भाव; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : शहरातील विविध भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, नगरपालिका प्रशासनाचे याकडे लक्ष देण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी मंगळवारी केली.
००००००
मास्क, सॅनिटायझर विक्रीत घट
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर औषध विक्रीच्या दुकानांमधून मास्क व सॅनिटायझरची विक्रीदेखील घटली आहे, असे औषध विक्रेते हुकूम पाटील तुर्के यांनी मंगळवारी सांगितले.
०००००
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम: सर्दी, खोकला, ताप आदी आजार उदभवले असून, अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली आहे.
०००००
रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
वाशिम : महागाव ते रत्नापूर मारमाळ पाणंद रस्ता अद्यात तयार झालेला नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबधितांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी १४ सप्टेंबर रोजी तालुका प्रशासनाकडे केली आहे.
००००
मेडशी परिसरात वन्यप्राण्यांचा त्रास
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात माकड, रोही, हरीण यासारख्या वन्यप्राण्यांच्या त्रास आहे. भाजीपाला पिकांची नासाडी होत आहे.