वाशिम : सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न आता बहुतांशी निकाली निघाला असून, निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. सुविधांसाठी लागणारा २.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने कामांना लवकरच प्रारंभ होईल, अशी माहिती जलसंपदाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली.जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पांकरिता दहापेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन झालेले आहे. त्यात मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पासाठी पाच गावे, रिसोड तालुक्यात पळसखेड प्रकल्पासाठी पळसखेड आणि बिबखेड ही दोन गावे; तर कारंजा तालुक्यात एका गावाचा समावेश आहे. त्यापैकी रिसोड तालुक्यातील मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेडा आदी गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंबंधी वेळोवेळी केलेले वस्तुनिष्ठ वार्तांकन आणि जलसंपदा विभागाने शासन स्तरावर केलेला पाठपुरावा, यामुळे ५ डिसेंबर २०१६ रोजी तत्त्वत: प्रशासकीय मान्यता आणि आता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून विकासकामांकरिता अपेक्षित २.२५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने संबंधित पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबवून कामांच्या ‘वर्कआॅर्डर’ काढण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली. लवकरच संबंधित गावांमध्ये अपेक्षित विकासकामांना प्रारंभ केला जाईल, असेही ते म्हणाले. बाधित ४६६ कुटुंबांना मिळणार विविध सुविधापुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकरिता आवश्यक असलेल्या २.२५ कोटी रुपयांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळाल्यामुळे बाधित ४६६ कुटुंबांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यात विशेषत: गावठानांतर्गत विद्युतीकरण, सुधारित पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम व इतरही अनेक कामे केली जाणार आहेत. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्प २००६-०७ मध्ये उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडीत क्षेत्राखाली गेले असून, या गावातील ४९ कुटुंबे यामुळे बाधित झाली आहेत, तसेच बिबखेड हे गाव पूर्णत: बुडीत क्षेत्राखाली असून, गावातील २४८ कुटुंबे बाधित झाली आहेत. दोन्ही गावांमध्ये वाढीव खर्चाच्या कामांसाठी १.१४ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून पळसखेडमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम, विद्युतीकरण, बिबखेडमधील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्युतीकरण व पोच रस्त्याची कामे केली जाणार आहेत. याशिवाय काही नागरी सुविधांच्या दुरुस्तीचाही त्यात समावेश आहे.सिंचन प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेड यासह इतर गावांमध्ये विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीस शासनाने सुप्रमा प्रदान केली असून, पुरेसा निधीदेखील प्राप्त झाला आहेत. त्यामुळे संबंधित गावांमध्ये प्रलंबित असलेली तथा रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण केली जातील. - शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता, वाशिम
पुनर्वसित गावांच्या विकासाचा प्रश्न निकाली!
By admin | Published: April 10, 2017 1:35 AM