लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून नियमित सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. तथापि, यासाठी तयार केलेल्या अर्थात मार्गदर्शक सुचनानुसार शिक्षकांच्या कोरोना चाचणीसह शाळांत सॅनिटायझर आणि थर्मल गन ठेवणे बंधनकारक आहे. शासकीय शाळांना शासनाकडून यासाठी निधी मिळणार असला तरी, खाजगी अनुदानित शाळांची मात्र पंचायत झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील ३६३ अनुदानित शाळांसमोर सॅनिटायझर आणि थर्मल गनच्या खरेदीचा प्रश्न उभा आहे. 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षण विभागाने मागील चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत. या आदेशानुसार, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ नोव्हेंबरपासून कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. मात्र ही चाचणी करण्यासाठी येणारा खर्च विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना परवडणारा नाही, याचबरोबर शाळांमध्ये थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटरसह शाळा सुरू करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी खासगी अनुदानित शाळांकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही.
शासनाचा शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. तथापि, यासाठी घालून दिलेल्या निर्देशानुसार शाळेत सॅनिटायझर, थर्मल गन किंवा ऑक्सीमिटर खरेदीसाठी आमच्याकडे पुरेसा निधी नाही. शासनाने यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद करावी. - प्राचार्य संजिवनी पाथ्रीकर, य.च. विघालय मंगरुळपीर
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची तयारी आहे. शासन निर्देशानुसार खाजगी अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदानातून सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमिटर खरेदी करावे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निर्जंतुकीकरण करून घ्यावे.-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, जि.प. वाशिम