कारंजा लाड : ४५ वर्षावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देणे सुरू असून, १२ मे रोजी कारंजा शहरात भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन तासात ताटकळत बसावे लागले. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात झाला तर? असा प्रश्न ज्येष्ठांमधून उपस्थित होत असून, सकाळी ७ ते ११ या वेळेत लसीकरण मोहिम राबवावी, असा सूर ज्येष्ठ नागरिकांमधून उमटत आहे.कारंजा शहरात विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी १०० डोस तर मूलजी जेठा हायस्कुल येथे २५० डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही ठिकाणी दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी टोकन वाटण्यात येत आहे. टोकन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सकाळी ६ वाजतापासून रांगेत उभे राहतात. ३५० लस घेण्यासाठी जवळपास ७०० नागरिक रांगेत उभे राहतात. त्यानंतर दोन तासाने रांगेत असणाऱ्यांना टोकन वाटण्यात येते. नंतर पुन्हा अडीच तासाने म्हणजे ९.३० वाजताच्या सुमारास आरोग्य कर्मचारी आल्यानंतर लसीकरणास सुरवात होते. ऊन अंगावर घेऊन लस घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.नागरिकांना तीन तास पेक्षा उन्हात बसून किंवा ज्या ठिकाणी सावली असेल त्या ठिकाणी बसावे लागते. त्यामुळे लसीकरणाची वेळ सकाळी ७ ते ११ या वेळेत करावी, अशी मागणी अक्षय देशमुख यांच्यासह ज्येष्ठांनी मंगळवारी केली.
लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 8:06 PM