काजळेश्वर : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन रब्बी पिके संकटात सापडली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून, थंडीचाही जोर वाढत असल्याने रब्बी पिके बहरू लागली आहेत. प्रामुख्याने पोषक वातावरणामुळे गहू पीक चांगलेच जोमात असल्याचे चित्र काजळेश्वर शिवारात दिसत आहे.
कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरात गत आठवडाभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका पिकासह इतर पिकांवर परिणाम होऊ लागला होता. त्यात हरभरा पिकांवर मर रोगासह घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला, तर मका आणि ज्वारी पिकावरही खोड कीड, मूळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकांचे काही प्रमाणात नुकसानही झाले. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानाची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती. तथापि, आठवडाभरानंतर वातावरण चार दिवसांपासून निरभ्र झाल्याने पिकांच्या स्थितीत सुधारणा होत असून, काजळेश्वर शिवारात गहू पीक चांगले बहरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
===Photopath===
100121\10wsm_5_10012021_35.jpg
===Caption===
निरभ्र वातावरणामुळे रब्बी पिके बहरली