वाशिम- यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे सुपिक जमिनीत तसेच सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकाच्या पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते.
खरीप हंगामात कमी पावसामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली तर उडीद, मूग व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना खरिप पिकाच्या उत्पादनात जबर फटका सहन करावा लागला. तसेच जलपातळीदेखील वाढ नव्हती. समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बी हंगामावरदेखील संकट घोंघावत होते. मध्यंतरी ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा आला. सिंचनाची सुविधा असणाऱ्या तसेच सुपिक जमिनीला परतीचा पाऊस बºयाच प्रमाणात पोषक ठरल्याने आता शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीला सुरूवात केल्याचे दिसून येते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी ८९ हजार २७० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. यापैकी ८१ हजार हेक्टरवर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.